अवघ्या १५ हजाराची गुंतवणूक करून दोन मित्र झाले कोटींचे मालक…

आयुष्यात उंच झेप घेण्यासाठी परिस्थिती कधीच आडकाठी होऊ शकत नाही. ठरावीक लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिक मेहनत केल्यास खेड्यातला साधारण शिकलेला तरुणही यशस्वी उद्योजक होऊ शकतो. खानगाव (ता. काटोल) येथील पंकज कुमेरिया व नितीन बऱ्हैया या वैदर्भीय युवकांनी ते सिद्ध करून दाखविले. केवळ बारावीपर्यंत शिकलेल्या पंचविशीतील तरुणांनी अवघ्या चार-पाच वर्षांत साहसी क्रीडा साहित्य निर्मितीचा व्यवसाय देशभर पसरवत १५ हजारांवरून १८ कोटींपर्यंत नेला.
पंकज कुमेरिया व नितीन बऱ्हैया हे शेतकरीपूत्र एकाच गावचे. जि. प. शाळेत शिकले. केवळ बारावी पास. कामापुरते शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या भानगडीत न पडता काहीतरी वेगळे करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. घरच्यांनीही त्यांना पूर्णसपोर्ट केला. जुनेवानी येथे ‘ॲडव्हेंचर कॅम्प’ चालविणारे शिक्षक भुदेव बहुरूपी यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर दोघेही घराबाहेर पडले.
२०१८ मध्ये त्यांनी पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे कारखाना सुरू केला. त्याचवेळी काटोलमधील कारखाना अन्य मित्रांच्या स्वाधीन केला आणि त्यांनाही कामात गुंतविले. पंकज व त्याच्या मित्राच्या कारखान्यात ‘ॲडव्हेंचर पार्क’मध्ये लागणाऱ्या साहसी क्रीडा साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. हवेत चालणाऱ्या सायकलपासून ते रॉकेट इंजेक्शनपर्यंत आणि स्काय रोलर ते रोलर कोस्टरपर्यंत असंख्य दर्जेदार ‘ॲडव्हेंचर प्रॉडक्ट्स’ची निर्मिती सुरू केली.
कंपनीच्या शंभरांवर साइट्स
भारतात एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर साहित्यांची निर्मिती कुठेही होत नाही. कल्पनाशक्तीच्या जोरावर नवनवीन साहित्य तयार करून देशभर विकले. आजच्या घडीला भारतात कंपनीच्या शंभरांवर साइट्स आहेत. दुबई व युगांडासारख्या देशातही साहित्यांची निर्यात केली. त्यामुळेच १५ हजारांत सुरू केलेला हा व्यवसाय १८ कोटींच्या घरात पोहोचू शकला. कंपनीत तज्ज्ञांची प्रॉडक्शन, रिसर्च, इंस्टॉलेशन व मार्केटिंग टीम आहे. त्यांच्या भरवशावरच एवढे साम्राज्य उभे करू शकल्याचे पंकज सांगतो.
‘व्हर्चुअल रिऍलिटी गेमिंग झोन’मध्ये उतरणार
कंपनीच्या माध्यमातून व्यसनाच्या आहारी गेलेल्या अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून दिला. त्यांच्या कुटुंबाचे भले केले. भविष्यात ‘व्हर्चुअल रिऍलिटी गेमिंग झोन’मध्ये उतरणार असल्याचे पंकजने सांगितले.
अनेक तरुण सरकारी नोकरी किंवा एखादा प्रायव्हेट ‘जॉब’ मिळविण्यासाठी शिक्षण घेतात. नोकरी लागली नाही की निराश होतात. परंतु, आम्ही नोकरीसाठी कधीच शिकलो नाही. आम्हाला आयुष्यात वेगळे काही करायचे होते. त्यामुळेच उद्योग क्षेत्र निवडले. यशस्वी उद्योजक होण्यासाठी भांडवल नव्हे, तर प्रामाणिकपणे मेहनतीची खरी गरज असते.
– पंकज कुमेरिया व नितीन बऱ्हैया, युवा उद्योजक