‘श्रीरामाने खालेले कंदमुळ’ म्हणून विकले जाणारे ‘काप’ म्हणजे नेमके काय आहे? खर कळल्यावर धक्काच बसेल..!

तुम्ही वाडी रत्नागिरी अर्थात जोतिबा डोंगरावर कधी गेलाय का, मग तिथे काही विक्रेते श्री रामाने खाल्लेले कंदमुळ म्हणून एका भल्या मोठ्या ओंडका सदृश्य मांसल कंदाचे काप विकत असताना तुम्ही पाहिले असेल, पण ते नेमकं काय आहे याचा कुणी विचार कधी केलाय का. हे कंदमुळ वगैरे काही नाही, तर ते आपल्याकडे आढळणा-या एका वनस्पतीचा खोडाचा भाग आहे.
जोतिबावर जाणा-या अनेक पिढ्यांनी हे कंदमुळ खाल्लं असेल, आणि श्रीरामाने खाल्लेय म्हणून आपणही ते श्रद्धेनं खाल्ल असेल. वनवासाच्या काळात राम सीता आणि लक्ष्मण यांनी हे कंदमुळं खाऊन दिवस काढले असल्याचे विक्रेते सांगतात, त्यामुळे लहानमुलं तर हमखास ते काप खातात. हे एवढं मोठं मुळ कुठल्या वनस्पतीचं असेल असा प्रश्नही अनेकांना पडतो, पण ते विक्रेते सांगतात की हे मुळ जंगलात मिळतं.
ही वनस्पतीची पूर्ण वाढ झाल्यानंतर तिला मधोमध एक बांबुसारखा कोंब येतो. त्याच्या टोकाला फुलोरा येऊन त्याला बीज लागतात. या फुलातून बीज रुजून त्याला या झाडावरच त्याची छोटी छोटी पिलं तयार होतात. हे या वनस्पतीचे वैशिष्ट्ये आहे.
या अवस्थेत वरचा बांबू आणि बाजूची पाने काढून टाकून मध्ये अननसासारखा भला मोठा भाग मिळतो. त्यातील पानाचा भाग तासून टाकून त्यावर रंधा मारला की पूर्ण सफेद रंगाचा कंदासारखा भाग तयार होतो, त्यावर लाल रंगाची काव लावून तो मातीतून काढलेला आहे, असे भासवून त्याची कंद म्हणून विक्री केली जाते.
संशोधकांनी जनुकीय चाचणी करून या वनस्पतीच्या कुळाचा शोध घेतला. डीएनए बारकोडींग पद्धतीचा वापर करण्यात आला . कंद म्हणून विकले जाणारे हे काप नैसर्गिक रित्या गोड नसतात, त्यावर सॅकरीन टाकून ते गोड करण्यात येते. पण त्यामध्ये व्हीकोजेनीन नावाचे स्ट्युराईड असते. त्यामुळे हे अतिप्रमाणात खाल्यास अपायकारक ठरू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे.
सदर लेख सकाळ वृत्तपत्रांमध्ये प्रथम प्रदर्शित झालेला आहे.
लेखक राजेंद्र घोरपडे