‘रामायणात अशी मिळाली होती कुशची भूमिका’ ; स्वप्नील जोशीने सांगितला गिरगावातला तो किस्सा

केंद्र सरकारने लॉकडाउनच्या काळात घरात बसून प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं यासाठी जुन्या मालिका पुन्हा एकदा प्रसारित करण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘रामायण’ ही मालिका प्रेक्षकांनी अक्षरश: उचलून धरली आहे.
‘रामायण’ प्रसारित झाल्याच्या पहिल्या आठवड्यापासून टीआरपीमध्ये प्रथम स्थानावर आहे आणि आजरवचे टीआरपीचे सगळे रेकॉर्ड या मालिकेने मोडीत काढले आहेत. रामायण मालिकेचे पुन्हा प्रसारण सुरू झाल्यामुळे त्यातील कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
सीता वनवासात जाते आणि मग लव-कुशचा जन्म होतो. तेव्हा काही दिवसांनी कळलं की उत्तर रामायण सुरू होणार आहे. तेव्हा सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. मी गिरगावात दहा बाय दहाच्या खोलीत राहायचो. खूप साधं घर होतं आमचं.
बाजूला काका-काकी राहायचे. समोर मामा-मामी राहायचे. लहानपणापासून आजी-आजोबांकडून रामायण ऐकलं. तेव्हा घरात टीव्ही, फोन काहीच नव्हता. संपूर्ण चाळीत एका-दोघांकडेच टीव्ही असायचं. रामायण पाहण्यासाठी आम्ही सगळे त्या घरात जायचो.
जेव्हा उत्तर रामायण सुरू होणार होतं, तेव्हा लव-कुश यांची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. त्यावेळी गणेशोत्सवाची सर्वत्र धूम होती. त्यातील कार्यक्रमांत मी सहभागी व्हायचो. तेव्हा चाळीतल्या एका नाटकात मी काम केलं होतं.
अभिनेते विलास राज यांनी रामायणात लवणासूर नावाच्या राक्षसाची भूमिका साकारली होती. ते चाळीतील एकाच्या घरी गणपती दर्शनासाठी आले होते. त्यांना पाहण्यासाठी खूप गर्दी झाली होती. दर्शन करून निघताना त्यांची नजर माझ्यावर पडली आणि त्यांनी विचारलं की हा मुलगा कोण आहे? मोहन जोशी यांचा मुलगा स्वप्नील आहे असं त्या काकांनी त्यांना सांगितलं.
तेव्हा त्यांनी विचारलं की मी त्याच्या वडिलांना भेटू शकतो का? विलास राज आमच्या घरी आले होते. त्यांनी वडिलांसमोर माझ्या नाटकाची स्तुती केली. त्यांनी माझा एक फोटो मागितला. वडिलांनी अल्बममधून तो काढून दिला. माझ्या वाढदिवसाचा एक फोटो ते घेऊन गेले. त्यांनी जाताना पुन्हा एकदा माझं कौतुक केलं. ते फोटो का घेऊन गेले होते हे मला नंतर समजलं.”
विलास राज स्वप्नीलचा फोटो घेऊन गेल्यानंतर पुढे काय घडलं हे तो पुढच्या व्हिडीओत सांगणार आहे. रामानंद सागर यांनी फोन केला तेव्हा काय झालं, कुशच्या भूमिकेसाठी स्वप्नीलची अंतिम निवड कशी झाली, हे त्या व्हिडीओतून समजेल.
त्याकाळी स्वप्नील जोशीने बालकलाकार म्हणून अनेक मालिकांमध्ये काम केलं असून कृष्णा या मालिकेतील त्याची बालकृष्णाची भूमिकाही प्रचंड गाजली होती. ही मालिका स्टार उत्सव चॅनेलवर प्रसारित झाली होती. आता ही मालिका लवकरच दूरदर्शनवर देखील बघायला मिळणार आहे.