रामायण : ‘भरत’ भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने कमी वयातच घेतला होता जगाचा निरोप…

चीनमधून उत्पन्न झालेल्या कोरोनाव्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. लाखो लोक या व्हायरसने प्रभावित झाले असून हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही कोरोनाव्हायरसने आतापर्यंत तीन हजारपेक्षा जास्त लोकांना याचा संसर्ग झाला आहे आणि जवळपास पन्नास लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसाचे लॉकडाऊन घोषित केले होते. या २१ दिवसांच्या लॉकडाउनमध्ये घरात बसून काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडला होता. या कठिण काळात प्रेक्षकांच्या मागणीनुसार ८० आणि ९०च्या दशाकातील मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली आहे.
रामायणाचे पुन्हा प्रसारण सुरू झाल्यामुळे या मालिकेतील सर्व पात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर आले आहेत प्रेक्षकांना पात्र साकारणाऱ्या कलाकारांविषयी जाणून घेण्याची खूप उत्सुकता बघायला मिळत आहे.
आज आपण रामायणामधील ‘भरत’ पात्र साकारणाऱ्या कलाकाराबद्दल जाणून घेणार आहोत. पण या मालिकेतील ‘भरत’ हे पात्र साकारणारे अभिनेते आज या जगात नाही हे किती लोकांना माहित आहे.
रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका ३३ वर्षांनंतर पुन्हा प्रदर्शित करण्यात आली आहे. मालिकेत राम, सीता, लक्ष्मण आणि भरत हे मुख्य पात्र आहेत. मालिकेत प्रभू रामांची भूमिका अरुण गोविल यांनी साकारली होती तर सीतेची भूमिका दीपिका चिखलियाने. तसेच अभिनेते संजय जोग यांनी ‘भरत’ हे पात्र साकारले होते. पण संजय यांचा वयाच्या ४० व्या वर्षी यकृत विकाराने, २७ नोव्हेंबर १९९५ रोजी मृत्यू झाला.
संजय जोग यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केलं आहे. त्यांनी १९८४ साली आलेल्या ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या चित्रपटात रमेश देशमुखची भूमिका साकारली होती. हा चित्रपट त्यावेळच्या हिट चित्रपटांपैकी एक होता. तसेच त्यांनी ‘सापळा’ या मराठी चित्रपटात देखील काम केले होते. ‘कुंकवाचा टिळा’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मायाबाप’, ‘आम्ही दोघे राजा राणी’, ‘खरं कधी सांगू नये’, ‘दिसत तसं नसतं’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.
त्यांनी जवळपास तिसपेक्षाही अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले. त्याचबरोबर हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये देखील त्यांनी भूमिका साकारली. ‘माया बाजार’ या गुजराती चित्रपटातील अभिमन्यूची भूमिका पाहून रामानंद सागर यांनी लक्ष्मण या पात्रासाठी संजय यांची निवड केली असल्याचे म्हटले जाते. मात्र व्यग्र वेळापत्रकामुळे त्यांना ‘भरत’ हे पात्र साकारावे लागले.
संजय यांनी अनेक नाटकांमध्ये देखील भूमिका साकारली होती. त्यातील ‘वस्त्रहरण’ हे त्यांचे नाटक विशेष गाजले होते. या नाटकामध्ये त्यांनी शकुनी मामांची भूमिका साकारली होती. हे नाटक त्यावेळी प्रचंड गाजले होते. त्यानंतर १९९४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बेटा हो तो ऐसा’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला.
संजय यांच्या पत्नीचे नाव नीता. त्यांना दोन मुले आहेत. रणजीत आणि नताशा.रणजीत देखील एक अभिनेता आहे. त्याने हॅम्लेट या गाजलेल्या नाटकात भूमिका साकारली आहे. त्याने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. ‘लपून छपून’, ‘आव्हान’, ‘जेता’, ‘सून माझी भाग्याची’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.